क्राईम

बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवे वळण

कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथील महालक्ष्मी हत्याकांडाचे गूढ गुंतागुंतीचे बनले आहे. या प्रकरणातील आरोपी मुक्तिरंजन प्रताप रॉय याने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह ओडिशात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मध्य-बंगळुरुचे डीसीपी शेखर एच. टेकण्णावर यांनी ही माहिती दिली आहे. बंगळुरुच्या मल्लेश्वरम भागातील एका इमारतीत मुक्तिरंजनने महालक्ष्मीची हत्या करून मृतदेहाचे ५० तुकडे केल्याचा आरोप आहे. शनिवारी महालक्ष्मीची आई आणि बहीण त्यांच्या घरी पोहोचल्यावर हा प्रकार उघडकीस आला होता.

बंगळुरु येथील राहत्या घरी रेफ्रिजरेटरमध्ये महालक्ष्मी (२९) या तरुणीची निर्घृण हत्या झाली होती. दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले की, संशयित आरोपी ओडिशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्याला पकडण्यासाठी अनेक पथके रवाना करण्यात आली होती.
महालक्ष्मीची निर्घृण हत्या करणारा मुक्तिरंजन वेगवेगळ्या ठिकाणांहून ओडिशात पोहोचल्याची माहिती बंगळुरु पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून बंगळुरु पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी ओडिशाला गेले होते, मात्र पोलिसांना त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली असून त्यात त्याने महालक्ष्मीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, मृत महालक्ष्मीच्या पतीने महालक्ष्मीच्या मित्रावर हत्येचा आरोप केला होता. या प्रकरणात आरोपी म्हणून अशरफ नावाच्या व्यक्तीचीही पोलिस चौकशी करत आहेत.

Related Articles

Back to top button