क्राईम

जनसुराज्यच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला

  • राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. काही तासांतच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मात्र त्याआधीच कोल्हापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घोरपडे काल सायंकाळी प्रचार आटोपून कोल्हापूरकडे परतत असताना मनवाड परिसरात सहा ते सात जणांनी त्यांची गाडी थांबवली. त्यावेळी या लोकांनी घोरपडे यांच्यावर हल्ला केला.
  • घोरपडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात घोरपडे यांच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्यातून आणि हातातून रक्तस्त्राव झाला. यानंतर हल्ला करणारे लोक जवळच्या शेतात पळून गेले. इतकेच नाही तर त्यांनी घोरपडे यांच्या वाहनांवरही दगडफेक केली. याप्रकरणी कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • प्रचार काळात हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला, कुणी केला याची माहिती अजून समोर आलेली नाही. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

Related Articles

Back to top button