क्राईम
घरात नवीन लग्नाची सत्यनारायणाची पूजा: मात्र पत्नीच्या डोक्यात भलतंच

- लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत तलाठी तरुणाने टोकाचा निर्णय घेतलेल्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मृताच्या आईच्या फिर्यादीवरून पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पत्नीचे कथित अनैतिक संबंध आणि त्यातून झालेल्या मानसिक त्रासामुळेच मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
- गणेश दत्तू कोळी (रा. मोरेवाडी, अंबाजोगाई) यांनी राहत्या घरी गळ्याला दोर लावला. या प्रकरणी त्यांची आई सुनंदा दत्तू कोळी यांनी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- फिर्यादीनुसार, १३ मे रोजी गणेश यांचा बीड येथील एका तरुणीसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनासाठी गेले असता पत्नीचे वर्तन संशयास्पद वाटू लागले. ती वारंवार कोणाशी तरी लपूनछपून फोनवर बोलत असल्याचे गणेश यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली; मात्र पत्नीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. तिने हे लग्न आपल्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगत गणेश यांच्यासोबत राहण्यास नकार दिला आणि अंबाजोगाईला परत गेली, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, २४ मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी गणेश अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या बहिणीला फोन करून पत्नीचे दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचे तसेच त्याबाबतची नोंद तिच्या डायरीत असल्याचे सांगितले. ही नोंद वाचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच पत्नी राहत असलेल्या खोलीत गणेश यांनी गळ्याला दोर लावून टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली, असे फिर्यादीत म्हटले आहे.



