सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात खळबळ, माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 14 भाविक ठार

- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या भल्या मोठ्या विहिरीत पिकअप वाहन कोसळून एकाच क्षणात 14 जणांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. सोलापूरच्या माळशिरसमधील म्हसवड – पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडीजवळ अपघात झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेले सर्व 14 जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. पिकअप वाहन रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाहनातील सर्व भाविक हे पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी होते. ते म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतत असताना हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेलाच विहीर असल्याने चालकाला तिचा अंदाज न आल्यामुळे वाहन थेट विहिरीत कोसळल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत कोसळलेल्या वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले. मात्र या भीषण दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.



