मनोरंजन

‘छावा’मधील अभिनेत्रीने संपवले स्वत:चे जीवन

  • मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री संचिता उगाले हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संचिता उगाले ही मुंबईलगतच्या नालासोपारा परिसरात आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होती. अचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तिच्या राहत्या घरी ही दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी संचिता घरात एकटीच होती. तिचे कुटुंबीय बाहेर गेले होते. याच काळात तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
  • कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला. सध्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर आलेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून कुटुंबीय, मित्रपरिवार आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. संचिताने चित्रपट आणि स्ट्रीमिंग प्रकल्पांमध्येही काम केले. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ऐतिहासिक सिनेमा ‘छावा’ मध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती ताराराणीच्या तरुण भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. 

Related Articles

Back to top button