गजऱ्यामुळे एक लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच मोठ्या अडचणीच सापडली आणि त्यापायी तिला मोठी रक्कम भरावी लागली. हे प्रकरण नक्की आहे तरी काय, असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल ना ! चला जाणून घेऊया.. प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायरला एक अजब आणि तितक्याच धक्कादायक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे मल्याळी समुदायाने आयोजित केलेल्या ओणम समारंभात सहभागी होण्यासाठी ती गेली. मात्र तिथे गेल्यावर तिच्यासोबत असे काही घडले, ज्याची तिने कधी स्वप्नानतही कल्पना केली नव्हती.
मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री नव्याला त्रास सहन करावा लागला. कारण तिच्या हँडबॅगमध्ये चमेलीची फुले असल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने तिला थांबवले. 15 सेमी लांबीचा छोटासा चमेलीचा गजरा नेल्याबद्दल तिला 1980 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (अंदाजे 1.25 लाख रुपये) चा मोठा दंड भरावा लागला. ओणम सेलिब्रेशनदरम्यान, तिने मंचावरून स्वतःच ही घटना शेअर केली. नव्याने सांगितले की, तिच्या वडिलांनी कोची विमानतळावरून तिच्यासाठी हा गजरा खरेदी केला होता. त्यांनी तो गजरा दोन तुकड्यांमध्ये विभागला होता.
त्या गजऱ्याचा एक भाग नव्याने कोचीहून सिंगापूरला जाणाऱ्या विमान प्रवासादरम्यान केसांत माळला होता. मात्र सिंगापूरला पोहोचेपर्यंत तो गजरा, फुले कोमेजली होती. म्हणून तिने गजऱ्याचा दुसरा भाग कॅरी बॅगमध्ये पॅक करून तिच्या पर्समध्ये ठेवून दिला. सिंगापूरला पोहोचल्यावर ती तो गजरा घालणार होती. पण ऑस्ट्रेलियातला अशा प्रकारे फुले घेऊन जाणे हे कायद्याच्या विरोधात आहे हे नव्याला माहीत नव्हते. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी तिची बॅग तपासली, तेव्हा चमेलीची फुले पाहून त्यांनी तिला थांबवले आणि लगेच दंड ठोठावला. ओणम सेलिब्रेशनदरम्यान व्यासपीठावरून नव्याने हा संपूर्ण प्रकार सांगितला आणि ती म्हणाली, मला माहित आहे की मी चूक केली आहे, पण ती जाणूनबुजून केलेली नाही. मी फक्त माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून गजरा घेऊन जात होते. त्यांनी मला 28 दिवसांच्या आत दंड भरण्यास सांगितले आहे, असेही नव्याने नमूद केले.
ऑस्ट्रेलियाचा जैव-सुरक्षा कायदा या बाबतीत खूप कडक आहे. ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सच्या वेबसाइटनुसार, सरकारी परवानगीशिवाय ‘वनस्पती, फुले आणि बिया’ यांसारखे जैविक साहित्य देशात आणण्यास मनाई आहे. कारण, हे पदार्थ कीटक, रोग आणि जैविक असंतुलन निर्माण करू शकतात. विशेषतः ज्या फुलांवर आणि बियांवर माती, पाने, शेंगा किंवा देठांचे अवशेष असतील त्यांना धोकादायक श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
ही घटना म्हणजे परदेशात प्रवास करताना स्थानिक वस्तू किंवा भावनिक वस्तू सोबत घेऊन जाणाऱ्या सर्वांसाठी एक इशारा आहे. कायद्याच्या अज्ञानामुळे अशी साधी चूक महागात पडू शकते, जसे नव्या नायरच्या बाबतीत घडले. त्यामुळे परदेश प्रवासादरम्यान सावध राहणे आणि तिथले नियम जाणून त्याप्रमाणे वागणे हेच उत्तम.