- सोलापूर – उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व मोहोळ या तालुक्यातील काही पूरग्रस्त नागरिक निवारा केंद्रातून त्यांच्या गावी जात आहेत. हे लोक त्यांच्या गावी पोहोचल्यानंतरही त्यांना दररोज दुपारी व रात्रीचे जेवण पुढील काही दिवस उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अक्षय पात्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेला आवाहन केले होते. त्यानुसार अक्षय पात्रा संस्था उपरोक्त तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी गेलेल्या 4500 लोकांना उद्यापासून दररोज दोन वेळा गरम व पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार आहे.
- यासाठी अक्षय पात्रा ही संस्था सोलापूर शहरातील जामगुंडी मंगल कार्यालय येथे या नागरिकांसाठी जेवण बनवण्याचे किचन उभारले असून यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सहकार्य केले आहे. या संस्थेची सोलापूर येथून दररोज दोन वेळा किमान 10 हजार लोकांना जेवण पुरवठा करण्याची क्षमता आहे. परंतु सद्यस्थितीत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व मोहोळ या तालुक्यातील जे नागरिक त्यांच्या मूळ गावी परत गेले आहेत. या सर्वांची एकत्रित मागणी 4500 जेवण इतकी असल्याने या संस्थेकडून मागणीप्रमाणे डब्यामधून गरम व पौष्टिक जेवणाचा पुरवठा उद्यापासून मोफत सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. तर आज रोजी दुपार व रात्रीचे असे प्रत्येकी सात हजार गरम जेवणाचे डब्बे संबंधित नागरिकांच्या मागणीप्रमाणे पोहोच करण्यात आले आहेत.
- या अक्षय पात्रा फाउंडेशन कडून माढा येथील पूरग्रस्त पाच हजार नागरिकांना मागील चार दिवसापासून दररोज दोन वेळचे गरम व पौष्टिक जेवण मोफत दिले जात आहे.
ऐन संकटात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुन्हा चर्चेत
