- राज्यात एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून अकरा सशस्त्र गुंडाना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी काल रात्री ही कारवाई केली आहे. यासंदर्भात अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून एकूण अकरा जणांना शस्त्रासह अटक करण्यात आल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
- अमरावतीच्या परतवाडा भागात ही घटना घडली आहे. एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी दोन ठिकाणांहून या सशस्त्र गुंडांना अटक केली असून अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यातील ब्राम्हण सभा कॉलनीतून पाच जणांना अटक केली तर कश्यप पेट्रोल पंपाजवळ सहा जणांना शस्त्रासह पकडण्यात एटीएस आणि ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
- अमरावतीमधील एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरात मागील अनेक दिवसांपासून हे गुंड राहत होते. या गुंडांबाबत अद्याप पोलिसांनी माहिती दिली नाही. मात्र, हे गुंड आंतरराज्यीय टोळी असल्याचे सांगितले जात आहे. या टोळीचा संबंध हरियाणा राज्यात असल्याचीही चर्चा आहे. एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरात शस्त्रासह गुंड मिळून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक
