- राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. आरोपीने पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की पत्नी जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि यातच तिचा मृत्यू झाला. ही हत्या केल्यानंतर आरोपी पती घरातून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात ही घटना घडली आहे. प्रशांत मारुती पाटील उर्फ गुंडा मिस्त्री (रा. भादोले) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर रोहिणी प्रशांत पाटील (वय 29) असे मृत पत्नीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत व रोहिणी हे दाम्पत्य भादोले येथे आपल्या दोन मुलींसह राहत होते. प्रशांतचा विवाह आठ वर्षांपूर्वी वाळवा तालुक्यातील ढवळी गावातील रोहिणीशी झाला होता. प्रशांतचा बाईक दुरुस्तीचा व्यवसाय असून घरात काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होते. रोहिणीचे वडील आजारी असल्याने ती वारंवार माहेरी जात होती. यावरून दोघांमध्ये वाद वाढत गेला.
- सोमवारी दोघे बाईकने ढवळीहून गावाकडे परतत होते. रात्री सुमारे आठच्या सुमारास त्यांनी वारणा नदीवरील पुल ओलांडल्यानंतर प्रशांतने बाईक थांबवली आणि अचानकपणे पत्नीच्या डोळ्यात चटणी फेकली. लगेचच त्याने जवळच्या कोयत्याने रोहिणीवर सपासप वार केले. निर्जनस्थळी ही घटना घडल्याने आसपास मदतीस कोणीही नव्हते. त्यामुळे रोहिणीचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर प्रशांतने रोहिणीचा मृतदेह तेथेच ठेवला. हातातील कोयता तिच्या अंगावर ठेऊन घरी निघून गेला. घरी जाऊन तिचा खून केल्याचे घरच्यांना सांगितले. त्यानंतर तो पसार झाला.
- सदर घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ तपास करून आरोपी पती प्रशांत याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. या घटनेमुळे रोहिणीच्या दोन मुली अनाथ झाल्या.
बायकोला माहेरहून घेऊन येताना बाईक थांबवली अन्…
