- राज्यात एका अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सापाच्या चाव्यामुळे एका चार वर्षीय बालिकेचा आणि तिच्या उपचाराधीन असलेल्या मावशीचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने दोघींचा जीव गेल्याचा गंभीर आरोप तिच्या पालकांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दालनात धारेवर धरले आणि जाब विचारत ठिय्या आंदोलन सुरू केले.
- डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालयात ही घटना घडली आहे. आजदे गावातील रहिवासी विक्की भोईर यांची चार वर्षांची मुलगी प्राणवी तिच्या आईसोबत माहेरी म्हणजेच खंबाळपाडा येथे गेली होती. रात्रीच्या वेळी प्राणवी तिची मावशी श्रुती ठाकूरजवळ झोपली असताना ती साप चावल्याने अचानक जोरजोरात रडू लागली.
- तिच्या रडण्याच्या आवाजाने श्रुती जागी झाली. श्रुतीने प्राणवीला तिच्या आईजवळ दिले, पण तिचे रडणे थांबत नव्हते. तिच्या रडण्याचे कारण कुणालाही समजत नव्हते. मात्र काही वेळातच त्याच सापाने श्रुतीला चावा घेतला. तेव्हा कुटुंबीयांच्या लक्षात आले की, प्राणवीलाही सापानेच चावा घेतला असेल.
- कुटुंबीयांनी तातडीने प्राणवी आणि श्रुतीला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी सुरुवातीला दोघांचीही तब्येत व्यवस्थित असल्याचे सांगितले. मात्र, एका तासाच्या उपचारानंतर प्राणवीची तब्येत अचानक बिघडली.
- परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहून कुटुंबीयांनी तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने, तिला रुग्णालयातून हलवण्यापूर्वीच शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच तिने अखेरचा श्वास घेतला.
- श्रुतीवर मात्र एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान श्रुतीचाही मृत्यू झाला. श्रुतीचे पुढील महिन्यात लग्न होते. त्याची तयारी देखील सुरू होती. मात्र या घटनेनंतर आनंदीत असणाऱ्या घरात दु:खाचे सावट पसरले आहे.
डॉक्टर म्हणाले, तब्येत ठीक आहे, मात्र…
