- सोलापूर जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सीना नदीला आलेल्या पुराने दि.15 ते दि.24 सप्टेंबर 2025 पर्यंत महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत एकूण 95 गावांचा वीज पुरवठा पुर्णत: खंडीत झालेला होता. परंतु गावातील पुराचे पाणी कमी झाल्यानंतर महावितरण कंपनीने तात्काळ 74 गावातील वीजपुरवठा पूर्ववत केलेला आहे, अशी माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दिली आहे.
- सोलापूर जिल्हयातील महावितरणचे 33/11 केव्ही क्षमतेचे एकूण 19 उपकेंद्र अतिवृष्टीमुळे व पूराचे पाणी उपकेंद्रात गेल्याने बंद करण्यात आले होते. करमाळा तालुक्यातील आवाटी, मोहोळ तालुक्यातील लांबोटी व भांबेवाडी, माढा तालुक्यातील कुंभेज, दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद, हत्तरसंगकुडल व वडकबाळ, अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव, गुडडेवाडी ही उपकेंद्र बाधित झाली होती. त्यामुळे 11 केव्ही क्षमतेच्या एकूण 92 वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. सदर 92 वाहिन्या बंद असल्याने एकूण 28 हजार 59 घरगुती ग्राहक व 39 हजार 41 शेती पंप ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झालेला होता, अशी माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेली आहे.
- तसेच सीना नदीकाठ भागात असलेले महावितरणचे शेतीपंपास वीज पुरवठा करणारे एकूण 5 हजार 604 वितरण रोहित्र फार मोठया प्रमाणात पाण्याखाली गेल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर वितरण रोहित्रांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरणचे अंदाजे नुकसान 25 ते 30 कोटी पर्यंत झाल्याचे आढळून आले आहे.
- महावितरणचे सर्व अभियंते व क्षेत्रीय कर्मचारी यांनी रात्रंदिवस प्रयत्न करून दि.24 सप्टेंबर 2025 पर्यंत एकूण 95 गावांपैकी 74 गावांचा वीज पुरवठा सुरळीत केलेला आहे. उर्वरित 21 गावे यांना वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्या व रोहित्र दि. 24 सप्टेंबर.2025 पर्यंत पुर्णत: पाण्यात असल्याने त्यांचा वीज पुरवठा अद्यापही खंडीत आहे. ज्या भागातील वीज पुरवठा खंडीत होता त्याभागात इतर उपकेंद्रामधून पर्यायी 11 केव्ही वाहिन्यांव्दारे वीज पुरवठा करून सुरळीत करण्यात आलेला आहे, अशी माहिती श्री. माने यांनी दिली.
- सोलापूर मंडळ अंतर्गत जेऊर उपविभागात 33 केव्ही वाहिनी चे 7 पोल पुराच्या पाण्यात पुर्णत: पडलेले असताना देखील पर्यायी 33 केव्ही वाहिनीव्दारे 7 गावांचा वीज पुरवठा मोठया प्रमाणत पाऊस असताना देखील 24 तासाच्या आत पुर्ववत करण्यात यश आले आहे, असे श्री.माने यांनी सांगितले.
- तसेच करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या सर्व उपविभांगामध्ये देखील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी अहोरात्र काम करून गावठाण भागातील वीज पुरवठा कसा पुर्ववत होईल याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना वीज सेवा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- या वीज पुरवठा पुर्ववत झालेल्या 74 गावांपैकी काही गावे दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी परत एकदा सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बाधीत झाली होती. ती सर्व गावे 24 तासाच्या आत पुर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. मोहोळ तालुक्यातील मोहोळ ते भांबेवाडी या 33 केव्ही वाहिनीचे पोल वरील एका फेजचे जम्प तुटल्याने दि.27 सप्टेंबर 2025 रोजी पोलच्या बुडात 25 फुटापर्यंत पाणी साचलेले असताना सुध्दा बोटीच्या साहयाने पोल पर्यंत पोहचून सदर वाहिनीचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला.
- अक्कलकोट तालुक्यातील 11 केव्ही कोर्सेगाव वीजवाहिनीवर, सीना नदीच्या पात्रात असलेल्या पोलजवळ एक झाड कोसळले होते. यामुळे वीजपुरवठा बाधित झाला होता. गोटयाळ गावातील वायरमन यांनी अत्यंत धाडसाने नदीच्या पाण्यात पोहून जाऊन झाड हटवले आणि बाधित भाग बंद करून इतर परिसराचा वीजपुरवठा सुरळीत केला. ही घटना प्रशासकीय तत्परता आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यनिष्ठेचे उदाहरण ठरली असून, अशा संकटसमयी तातडीने हस्तक्षेप करून जनतेला दिलासा देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे.
- नदीकाठच्या भागात अनेक शेतीपंप वाहिन्या व रोहित्र अद्यापही पाणी व गाळात अडकलेले आहेत. त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर आणि पोल उभे करण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर, त्या ठिकाणी तात्काळ देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे.
- या कार्यासाठी महावितरणकडे 262 सूचीबद्ध कंत्राटदार सज्ज असून, त्यांच्याकडे आवश्यक साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध आहे. सध्या 21 गावांचा वीजपुरवठा अद्यापही खंडित असून, येत्या दोन दिवसांत प्राधान्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. ही कार्यवाही वीज वितरण कंपनीची तत्परता, नियोजनबद्धता आणि नागरिकांच्या गरजांप्रतीची संवेदनशीलता आहे.
सोलापूर! महावितरणची धडाकेबाज कामगिरी
