पेट्रोल, डिझेल अन् इलेक्ट्रिक गाड्याही विसरा!

वाहन उद्योगामध्ये आता एका मोठ्या बदलाची सुरुवात होणार असून, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून सामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १०० टक्के इथेनॉलवर (E100) चालणाऱ्या वाहनांच्या नियमावलीला अधिकृत मंजुरी दिली आहे.
निर्णय भारताच्या जैवइंधन मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. नितीन गडकरी यांनी १२ जून रोजी या नियमावलीवर स्वाक्षरी केली. या निर्णयामुळे आता वाहन बनवणाऱ्या कंपन्या आणि इंधन विक्रेत्यांसाठी पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना देखील ८० हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. या मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी मारुती सुझुकी वॅगनआर ही देशातील पहिली फ्लेक्स-फ्यूल हॅचबॅक कार सादर करण्यात आली आहे. केवळ मारुतीच नव्हे, तर टोयोटा, ह्युंडाईसह अनेक मोठ्या कंपन्या देखील लवकरच आपली E100 इंधनावर चालणारी मॉडेल्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. सामान्य नागरिकांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केल्यामुळे प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो, कारण इथेनॉलचे दर पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त असू शकतात.



