सात दिवसांच्या मुलीला कचऱ्यात फेकले..

एका कचरा कुंडीत एका चिमुकलीला फेकून देण्यात आले होते. तिला एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरले होते. या चिमुकलीच्या भोवती कुत्रेही गोळा झाले होते. मात्र त्याच वेळी तिथल्या स्थानिक असलेल्या पूजा लावेकर यांनी ते पाहीले. त्यांनी त्या मुलीला आपल्या घरी आणले. त्यामुळे चिमुकलीचा जीव वाचला.
पूजा लावेकर या कल्याण पूर्वेला राहातात. त्या शाळेत काम करतात. सकाळच्या सुमारास त्या कचरा टाकण्यासाठी गेल्या होत्या. पिंपळाच्या झाडा शेजारी कचरा कुंडी आहे. त्यामुळे त्या तिथे गेल्या. त्याच वेळी त्यांना एक प्लास्टिकची पिशवी दिसली. ती हलत होती. शिवाय कुत्रे ही तिथे भूंकत होते. त्याच वेळी पिशवीतून बाळाचे डोके बाहेर पडले. त्यांनी ते पाहीले. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता त्या बाळाला आपल्या ताब्यात घेतले. तिथे जमलेल्या कुत्र्यांना हाकलले. ते हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे त्यांनी बाळाला आपल्या घरी नेले. घरी गेल्यानंतर त्यांनी घरातल्या आणि अजूबाजूच्या लोकांना याची माहिती दिली. स्थानिकांनी तातडीने ही बाब पोलीसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी त्या बाळाला ताब्यात घेतले. शिवाय उपचारासाठी बाळाला महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. तिथे बाळावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे.
बाळाची नाळ पाहिली असता ते सात दिवसाचे असावे, असे डॉ. सुलोचना त्रिभुवन यांनी सांगितले. बाळाची तब्बेत ठणठणीत असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या नवजात मुलीला कचरा कुंडीत कोण टाकून गेले याचा शोध पोलिस घेत आहेत.



