महाराष्ट्र

जबरदस्त! तुकाराम मुंढेंचा नवा धमाका

सर्वसामान्यांची आर्थिक लूट थांबण्यास मदत होणार 

आपल्या धडक कारवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची काही दिवसांपूर्वीच अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, भेसळ अन्नपदार्थाविरोधात धडक कारवाई करत राज्यभरातून कोट्यावधीचा साठा जप्त केला आहे. यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा रुग्णालयांकडे वळवला आहे. तुकाराम मुंढे यांच्या नव्या आदेशामुळे रुग्णालयांच्या या एकाधिकारशाहीला आणि मनमानी नफेखोरीला पूर्णपणे ब्रेक लागणार असून, सर्वसामान्यांची आर्थिक लूट थांबण्यास मदत होणार आहे.

पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे म्हणाले की, रुग्णालयामध्ये एखादा रुग्ण दाखल असेल, तर त्याला लागणारी औषधे त्याच रुग्णालय परिसरातील मेडिकलमधून घेण्याची सक्ती केली जाते, अशा अनेक ठिकाणच्या तक्रारी आमच्याकडे येतात. परंतु, कायद्यानुसार कोणतीही संस्था किंवा रुग्णालय रुग्णांना अशी सक्ती करू शकत नाही. बाहेरून औषधे आणणे हा रुग्णाचा वैयक्तिक अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही कोणावरही सक्ती करू शकत नाही. औषध कुठून खरेदी करायचे, हा प्रत्येक नागरिक आणि रुग्णाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु, अनेक मोठ्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये स्वतःच्या अंतर्गत मेडिकल चालवले जातात. मात्र अनेकदा रुग्णालयाबाहेर किंवा इतर मेडिकल स्टोअर्समध्ये तीच औषधे सवलतीच्या दरात किंवा जेनेरिक स्वरूपात उपलब्ध असतात. असे असले तरी रुग्णालय प्रशासन छुप्या नियमांचा हवाला देऊन रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणू देत नाही, अशा अनेक तक्रारी एफडीएकडे आल्या होत्या. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतःच्या अंतर्गत येणाऱ्या मेडिकलमधून औषध खरेदी करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Related Articles

Back to top button