क्राईम

बारमध्ये दारूच्या नशेत ‘त्या’ हत्येची फुशारकी

पाच वर्षांपूर्वीच्या मर्डर मिस्ट्रीचा अखेर पर्दाफाश

अपघात दाखवून मित्राची हत्या करणार्‍या चार जणांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. मनोज नारायण भंडगे, सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर, आतिष भगवान मोरे आणि ऋतुराज शेट्टी अशी या चौघांची नावे आहेत.

मुंबईतील एका बारमध्ये दारूच्या नशेत एका व्यक्तीने आपण पाच वर्षांपूर्वी एकाची हत्या केल्याची फुशारकी मारली आणि त्याच एका वाक्यामुळे तब्बल पाच वर्षांपासून दडलेले हत्याकांड उघडकीस आले. आर्थिक वादातून अश्पाक मुलानी ऊर्फ निहाल याची हत्या करून या आरोपींनी हत्येचा पुरावा नष्ट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 2022 रोजी सिंधुदुर्गच्या कुडाळ, फोंडा घाटात अश्पाक मुलानी याचा अपघातात झाला होता. या अपघातात तो त्याच्या बाईकसह खोल दरीत पडला होता. या घटनेनंतर कणकवली पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला होता. तसेच तपासात सदर घटना अपघात असल्याचे उघडकीस आल्यानंतर ही केस बंद करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्यांतील मृत व्यक्तीची त्याच्याच मित्रांनी संगनमत करून हत्या केली आणि हत्येची पुरावा नष्ट करण्यासाठी अपघात दाखवल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांना मिळाली. या माहितीनंतर पोलिसांनी या गुन्ह्यांतील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे उघडकीस येताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, एपीआय सुहास खरमाटे, धनाजी साठे, महेश शेलार, स्वप्निल काळे, महिला एपीआय वैशाली सरवदे, पोलीस उपनिरीक्षक परबळकर, अरुण सावंत व अन्य पोलीस पथकाने चार आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली.

आरोपींच्या चौकशीत समोर आले की, अश्पाकसोबत त्यांचे आर्थिक वाद सुरू होते आणि याच वादातून त्यांनी त्याला कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. तिथे अश्पाकला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आणि अपघात दाखविण्यासाठी आरोपींनी अश्पाकसोबत त्याची बाईक खोल दरीत फेकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाच वर्षांनी या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आणि चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Related Articles

Back to top button