तुकाराम मुंढेंचा भेसळमाफियांवर प्रहार सुरूच!

राज्यभर 27 ठिकाणी छापे; सुपारी, खाद्यतेल, पिण्याचे पाणी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, पेढा, तूप…
अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभर भेसळ माफिया, गुटखा तस्कर आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात जबर मोहीम सुरू झाली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर विभागातील सात जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी धडक कारवाई करण्यात आली. 1 ते 9 जून या कालावधीत अन्न व औषध प्रशासनच्या पथकांनी 27 ठिकाणी छापे टाकून तब्बल 2 कोटी 47 लाख 75 हजार रुपयांचा संशयित व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त केला आहे. या कारवाईत उत्पादन युनिट्स, गोदामे, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, चुकीचे लेबलिंग, निकृष्ट दर्जाचे उत्पादन आणि भेसळीचे प्रकार आढळून आले.
या धाडीत केवळ गुटखा आणि सुगंधी तंबाखूच नव्हे तर नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेला मोठा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी “सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र” ही मोहीम आक्रमकपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यभर एकाचवेळी विविध विभागांमध्ये धाडी टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थ, कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे, बनावट दुग्धजन्य पदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादनांवर कारवाई केली जात आहे.



