क्राईम

लग्नाच्या वाढदिवसाला आली अन् घर लुटून पळाली मैत्रीण

मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या मैत्रिणीच्या घरी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाहुणी म्हणून आलेल्या एका महिलेनेच घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार घडला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. 

उल्हासनगरच्या आनंदनगर परिसरात भूषण खंडागळे हे आपल्या कुटुंबासह राहतात. नुकताच त्यांचा लग्नाचा वाढदिवस असल्याने खंडागळे दांपत्याने त्यांच्या ओळखीची मैत्रीण साक्षी आयुष बोराडे हिला घरी निमंत्रित केले होते. मैत्रीच्या नात्यामुळे कुटुंबाने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिला 24 ते 26 मे या कालावधीत घरी पाहुणी म्हणून राहण्यासाठी बोलावले होते.

लग्नाच्या वाढदिवसामुळे घरात आनंदाचे वातावरण असताना साक्षीने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. घरातील लोक कार्यक्रमाच्या गडबडीत गुंतलेले असताना तिने शिताफीने कपाटात ठेवलेल्या दागिन्यांवर हात साफ केला.

तब्बल एक लाख 66 हजार 736 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून ती तिथून फरार झाली. संपूर्ण घरात शोधाशोध करूनही दागिने न सापडल्याने कुटुंबाला धक्का बसला आणि चोरी झाल्याचे समोर आले.

आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर भूषण यांनी तातडीने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी साक्षी हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

Back to top button