शरद पवारांची मोठी कारवाई

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोठा निर्णय घेत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल जगताप यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
श्रीगोंदा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनुराधा नागवडे यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. मात्र तरीही देखील या मतदारसंघात माजी आमदार जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
जगताप यांनी आघाडी धर्म न पाळता ठाकरे गटाच्या उमेदवार नागवडे यांच्यावर आरोप केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत होती. त्यानुसार जगताप यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.



