सोलापुरात शरद पवारांची सर्वांनाच तंबी
विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबविण्यात येणार आहे. तसेच अधिसूचना जारी झाल्यापासून 28 दिवस निवडणूक प्रचार सुरू होता. त्यानंतर आज सर्व नेते आपआपल्या होमग्राऊंडवर सभा आणि पदयात्रा करणार असल्याची माहिती आहे. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची काल सोलापुरात सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. सगळ्यांचा नाद करायचा पण माझा नाही, अशा शब्दात त्यांनी चांगलेच सुनावले.
एकदा एखादा रस्ता चुकला की, त्याला जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना जोरात पाडायचे आहे. असे पाडायचे की, त्याचा पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की. तसेच सगळ्यांचा नाद करायचा पण माझा नाही, अशा शब्दात पवारांनी सुनावले आहे. काल ते सोलापुरातील टेंभूर्णी येथे प्रचार सभेत बोलत होते.
सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी करणे आणि राज्याच्या राजकारणात बदल करणे हे ऐतिहासिक काम उद्याच्या 20 तारखेला तुम्हा सर्वांना करायचे आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी तुम्ही विजयी करा. माझी खात्री आहे की, महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन पवारांनी केले.