ब्रेकिंग! मुंबईत ढगफुटी?
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता बरसायला सुरूवात केली. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात धुमाकूळ घातल्यानंतर आता मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू झाला. मुंबई शहर आणि उपनगरात काल सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील भांडुप, कांजूरमार्ग आणि विक्रोळी येथील रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. दरम्यान, बीएमसीने हायअलर्ट जारी केला.
दरम्यान, पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. अंधेरी सबवेवर दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. मुलुंड आणि विक्रोळी पट्ट्यात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे मुंबईत चार जणांचा जीव गेला आहे. वीज पडून कल्याणच्या वराप गावात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, झेनिथ धबधब्यात पडून एक महिला वाहून गेली. एक महिला अंधेरी पूर्व येथे मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडली आहे.
मुंबईत काल रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणतील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी होती. आजही पावसाचा मुक्काम कायम राहणार असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.