हवामान
ब्रेकिंग! राज्यात पावसाचा जोर वाढला
सोलापूर शहर आणि परिसरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे.
हवामान विभागाने कोकण, गोवा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आजपासून 24 सप्टेंबरपर्यंत पालघर, ठाणे, रायगड येथे विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुणे, सोलापूर, सातारा, नंदुरबार, नाशिक येथे देखील विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच पुढील चार दिवस मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तर विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.