नवरात्रीच्या पूर्वसंध्येपासून राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत असून पुढील दोन दिवसही जोरदार पाऊस राहणार आहे. राज्यातील अनेक भागांत यल्लो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, तर विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण भागात पाऊस अद्यापही सुरुच असून काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात धाराशिवच्या उमरगामध्ये पावसाने उच्चांकी गाठली असून 120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान कायम आहे. आज मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, उत्तर अंदमान समुद्रात म्यानमारच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने या भागात आज हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे.
या प्रणालीपासून उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यातच दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत गुरुवारपर्यंत (ता. २५) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.