काही दिवसांपूर्वी पुण्यात आयुष कोमकर या तरुणाची हत्या करण्यात आली. पार्किंगमध्येच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीमधील अनेकांना अटक केली आहे.
गेल्या वर्षी पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गणेश कोमकर याच्यावर वनराज यांच्या हत्येचा आरोप आहे. सध्या गणेश कोमकर हा जेलमध्ये आहे. तर ज्याची आता हत्या झाली तो आयुष हा गणेश कोमकर याचा मुलगा आहे. आपल्या मुलाच्या हत्येचा बदल घेण्यासाठीच बंडू आंदेकर याने आपल्याच नातवाची, लेकीच्या मुलाची आयुष याची हत्या घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात सध्या तो अटकेत आहे.
दरम्यान आता पोलिसांनी बंडू आंदेकर आणि आंदेकर टोळीवर मोठी कारवाई केली आहे. आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर पुणे पोलिसांनी हातोडा चालवला आहे. पुण्याच्या नाना पेठ परिसरात असलेली आंदेकर टोळीची अवैध बांधकामे पाडायला सुरुवात झाली आहे. पुणे महापालिका आणि पोलिसांची नाना पेठमध्ये संयुक्त कारवाई सुरू आहे. बांधकामासोबत आंदेकर टोळीचे अनधिकृत फ्लेक्स देखील पोलिसांनी पाडले आहेत. तसेच वनराज आंदेकर यांचे स्मृतिस्थळ असलेली पाणपोई देखील गॅस कटरच्या मदतीने काढण्यास सुरुवात झाली आहे.