राजकीय
अजितदादांच्या हातातून घड्याळ चिन्ह जाणार?
राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता अजितदादा पवार गटाचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे.
जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोन्ही गटांना दोन नवीन निवडणूक चिन्हे द्या, अशी मागणी करणारी याचिका शरद पवार गटाने न्यायालयात दाखल केली आहे.
न्यायालयाने ही याचिका तातडीने सूचीबद्ध करावी, अशी मागणी पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली होती. त्यानुसार याचिका सूचीबद्ध करण्यात आली असून या याचिकेवर येत्या 25 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
विधानसभा निवडणुकी आधी पक्ष चिन्हाबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावे. घड्याळ चिन्हाचा फायदा एकाच गटाला व्हायला नको, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.