हवामान
ब्रेकिंग! उष्णतेची लाट येणार, यंदाचा उन्हाळा कडक राहणार

- भारतीयांना यंदाच्या उन्हाळ्यात घामाच्या धारांची तयारी ठेवावी लागणार आहे. कारण यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) देशभरात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील.
- उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त राहील. संपूर्ण देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
- हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजे मार्च – मे दरम्यान देशभरातील कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. दक्षिण भारत वगळता राज्यासह देशभरात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा उन्हाळा जास्त तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. राज्यात उन्हाळी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यामुळे उन्हाळी पाऊस नुकसानकारक ठरण्याचा अंदाज आहे.
- प्रशांत महासागरात सध्या सक्रीय असलेला ला निना अगोदरच कमकुवत आहे. तो आणखी कमकुवत होताना दिसत आहे. एप्रिल अखेर ला निना निक्रीय होण्याची शक्यता आहे. तसेच लगेच एल निनोही सक्रीय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत महासागरात कोणतीही स्थिती नसेल, याचा देशभरातील पावसाळ्यावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे.