क्राईम
पोलीस असल्याचे सांगत भरदिवसा रिक्षा चालकाला लुटले

पोलीस असल्याची बतावणी करून रिक्षा चालकाशी वाद घालून रिक्षा चालकाचे महागडं घड्याळ आणि ब्लू टूथ काढून घेतल्याची धक्कादायक घटना सांताक्रुज परिसरात घडली. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त महेश मुगुटराव यांनी दिली.
भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रिक्षाचालक एका ठिकाणी थांबला होता. त्यानंतर दोन जण आले आणि त्यांनी जबरदस्तीने भांडण उकरुन काढले. यानंतर तो रिक्षा चालक आपल्या घरी जाऊ लागताना आरोपींनी ऑटो रिक्षा थांबवून त्याच्याकडील ऐवज लुटला.
त्याच्या कानातील ब्लू टूथ आणि हातातले महागडं घड्याळ आरोपींनी हिसकावून नेले.
विशेष म्हणजे यातील आरोपी स्वत: पोलीस असल्याचे सांगत त्यांनी रिक्षा थांबवून रिक्षा चालकाकडील ऐवज लुटला.
यानंतर त्यांनी आपला मोबाईल नंबर देऊन तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने त्यांचा नंबर डायल करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्या फोनवर कोणताही प्रतिसाद आला नाही. यानंतर तक्रारदार रिक्षा चालकाने जुहू पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दिली.