लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला जाताना महिलांची बस खोल दरीत कोसळली
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हफ्ताही या महिन्यातच जमा झाला आहे. या योजनेचा सरकारकडूनही जोरदार प्रचार होत असून अनेक जिल्ह्यात वचनपूर्ती मेळावे भरवले जात आहेत. वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्प्यातील शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात होत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या महिलांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. २९ महिलांना घेऊन जाणारी बस २० फूट खोल दरीत कोसळली आहे.
माणगाव तालुक्यातील मांजरोने घाटात हा अपघात झाला आहे. या अपघातात ८ महिला जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
रानवडे कोंड येथून २९ महिला लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी माणगावला निघाल्या होत्या. मांजरोने घाटात येताच चालकाचे नियंत्रण सुटले व बस खोल दरीत कोसळली. यामध्ये जखमी महिलांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.