राजकीय

मोठी बातमी! राज्यात नाट्यमय घडामोडी

विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. काही संस्थांनी महायुती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतांच्या टक्केवारी महायुती आणि महाविकास आघाडीचाही विश्वास दुणावला आहे.

या निवडणुकीत बंडखोर किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या बंडोबांशी आतापासूनच संपर्क साधण्यात येत आहे. तर ऐनवेळी काही दगाफटका होऊ नये यासाठी खास विमाने आणि हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या आहेत.

ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. जर काठावरचे बहुमत मिळाले तर सत्तास्थापनेसाठी प्लॅन बी तयार करण्यात येत आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. तसेच विजयी झालेले बंडखोर आणि अपक्ष आमदारांना मुंबईत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडळींची राहण्याची व्यवस्था फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.

भाजपने सॉफीटेल हॉटेल तर ठाकरे गटाने ग्रँड हयात हॉटेलमधील खोल्या बुक केल्याची माहिती मिळाली आहे. अपक्ष आमदारांना आपल्याकडे घेण्यासाठी त्या त्या विभागातील मोठ्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ नेते मंडळींच्या एका मागोमाग एक बैठका सुरू झाल्या आहेत.

Related Articles

Back to top button