राजकीय

विधानसभेच्या निकालापूर्वीच महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला

विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. काही संस्थांनी महायुती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतांच्या टक्केवारी महायुती आणि महाविकास आघाडीचाही विश्वास दुणावला आहे.

काही एक्झिट पोल्सने असाही अंदाज व्यक्त केला आहे की, महायुती किंवा महाविकास आघाडीला अपक्षांना सोबत घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही. तेव्हा दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी अपक्ष आणि बंडखोरांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत किती बंडखोर आणि अपक्ष निवडून येतील, याचा अजून तरी अंदाज नाही. या पार्श्वभुमीवर शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू, असे केसरकर म्हणाले.

केसरकर पुढे म्हणाले, निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही महायुती म्हणून सरकार स्थापन करू शकतो. जर गरज पडली तर आम्ही अपक्षांनादेखील सोबत घेऊन सरकार स्थापन करू. या निवडणुकीत साधारण 10 ते 15 अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. केसरकर यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Back to top button