ब्रेकिंग! प्रकाश आंबेडकरांनी पत्ते उघडले
विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. काही संस्थांनी महायुती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतांच्या टक्केवारी महायुती आणि महाविकास आघाडीचाही विश्वास दुणावला आहे.
अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असेल, याबाबत आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट केले आहे. बहुतांश मतदारसंघांमधील बंडखोरी तसेच तिरंगी लढती लक्षात घेता बहुमतासाठी महायुती किंवा महाविकास आघाडीची ओढाताण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत छोट्या पक्षांसह अपक्षांची भूमिका निर्णायक ठरेल. लहान पक्ष आणि अपक्षांचे सरकार बनेल आणि आम्ही दुसर्यांचा पाठिंबा घेत अपक्षांचा मुख्यमंत्री बसवू, असा दावा प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे.
त्यापाठोपाठ आता आंबेडकर यांनी सत्तेत सहभागी होण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्याएवढे संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांसोबत राहणे पसंत करू, असे आंबेडकर यांनी सांगितले.