राजकीय
निकालाआधीच भाजपला दणका
- विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. मतदानानंतरच्या काही एक्झिट पोल्सने महायुती तर काही पोल्समध्ये महाविकास आघाडीला कौल राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या माहिम विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे माहिम विधानसभेचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
- राज्याच्या विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला होता. माहिममध्ये शिंदे गट, ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे तीन पक्ष मैदानात उतरले होते. मनसेकडून खुद्द राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले होते. दुसरीकडे शिंदे गटाकडून याठिकाणी सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला होता. सरवणकर यांचा अर्ज माघार घेण्यावरुन बरेच राजकारणही तापले होते.
- अशातच निकालाच्या एक दिवस आधी माहिम मतदारसंघामध्ये ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे. सचिन शिंदे यांनी आज मातोश्रीवर दाखल होत ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सचिन शिंदे यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक, कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. निकालाच्या एक दिवस आधीच भाजपला मोठे खिंडार पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.