महेश बाबूची क्रेझच न्यारी
सोलापूरसह अन्य भागात दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबू याची जादू पहावयास मिळत आहे. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान सध्या या चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटात रणबीरसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, दोघेही वेगवेगळ्या प्रमोशन इव्हेंट्सना एकत्र हजेरी लावत आहेत. नुकतीच या चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी हैदराबादच्या मल्ला रेड्डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पोहोचली होती. यावेळी साऊथ स्टार महेश बाबू आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी देखील प्रमोशन कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान, पुन्हा एकदा महेशची चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे, ते पाहायला मिळाले.
‘अॅनिमल’ चित्रपटाची टीम मंचावरून चाहत्यांशी संवाद साधत असताना महेश बाबू याचा एक चाहता धावत मंचाच्या दिशेने आला. त्याने अचानक मंचावर उडी घेत महेशला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. स्वतः महेशला भेटून त्याचे स्वागत करावे आणि त्याला जवळून बघता यावे, यासाठी चाहत्याने हा आटापिटा केला होता. यावेळी या चाहत्याने सुरक्षाव्यवस्था सहज भेदली. तो इतक्या वेगाने धावत आला की, कुणालाही कळण्याच्या आत तो महेश बाबूपर्यंत पोहोचला होता. यावेळी सुरक्षा रक्षकांनी या चाहत्याला पकडून महेश बाबूपासून दूर केले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
महेश बाबूची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ सतत पाहायला मिळते. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महेश बाबूदेखील आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये झकास डेब्यू करण्याच्या तयारीत आहे.