धक्कादायक विधानामुळे रश्मिका पुन्हा चर्चेत
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटात झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यापाठोपाठ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता असतानाच एका अभिनेत्याने रश्मिकाला अभिनय जमत नाही, असे प्रचंड धक्कादायक विधान केले आहे.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कमाल आर. खान आहे. त्याचे प्रत्येक ट्वीट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्वीटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्वीटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेकवेळा ट्रोल करतात. आता कमालने रश्मिकावर निशाणा साधला आहे.
दरम्यान कमालने अॅनिमल चित्रपटातील रश्मिका आणि रणबीरचा एक सीन शेअर केला आहे. या सीनमध्ये रश्मिका रणबीरवर चिडताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कमालने, हा व्हिडीओ पाहून सिद्ध होते की रश्मिकाला अभिनय जमत नाही आणि तरीदेखील तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येतात. जर बॉलिवूडमध्ये केवळ अभिनयाच्या जोरावर चित्रपट मिळत असते तर कतरिना कैफ, नरगिस, जॅकलिन हा अभिनेत्री झाल्याच नसत्या, या आशयाचे कॅप्शन दिले आहे.