सोलापूर
बाईकला कट मारल्याच्या कारणावरून सोलापुरात मोठा राडा
सोलापूर (प्रतिनिधी) दुचाकी गाडीवरील तरुणाने कट मारला म्हणून त्याचा जाब विचारताना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एका जनाविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जुनी धोंडीबा वस्ती रामवाडी दवाखान्याच्या मागे घडली.याप्रकरणी सिद्धारूढ शिवप्पा शिकलवाडी (वय-३५,रा.जुनी धोंडीबा वस्ती) यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून सोन्या उर्फ दीपक शिवशरण (रा.रामवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोर त्यांची आई अन्नपूर्णा यांच्यासोबत बोलत थांबलेले असताना रामवाडी येथील राहणारा सोन्या उर्फ दीपक शिवशरण याने त्याच्या दुचाकी गाडीने कट मारला म्हणून त्याला का रे बाबा अंगावर गाडी घालतो का असे विचारल्यावर त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी करून डोक्यात,चेहऱ्यावर लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले आहे.असे फिर्यादीत नमूद आहे.तपास पोलीस हवालदार कदम हे करीत आहेत.