मनोरंजन

भगव्या बिकिनी वादात मुस्लीम संघटनेची उडी

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनित पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. मात्र, या चित्रपटाला आतापासूनच विरोध होत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज करण्यात आले.

या गाण्यात दीपिका अत्यंत बोल्ड अवतारात दिसत आहे. याशिवाय तिने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे आणि याच गोष्टीवरुन हा चित्रपट वादात अडकला आहे. या प्रकरणावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत. ज्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होईल ते चित्रपटगृह जाळून टाकू, अशी धमकीही देण्यात आली आहे. दरम्यान आता भगव्या बिकिनीच्या वादात मुस्लीम संघटनेने उडी घेतली आहे. मध्य प्रदेशातील उलेमा बोर्डाने हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

मुस्लीम धर्माची बदनामी करण्याची परवानगी कोणालाही नाही, असे बोर्डाचे म्हणणे आहे. बोर्डाचे अध्यक्ष सय्यद अली यांनी पठाण चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. आम्ही हा चित्रपट केवळ मध्य प्रदेशातच नव्हे तर देशात अन्यत्र कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही. पठाण असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये दीपिका अश्लिल नृत्य करताना दिसत आहे. याला आमचा तीव्र आक्षेप असल्याचे अली यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button