खेळ
जबरदस्त! ऋतुराज गायकवाडचा वर्ल्ड रेकॉर्ड; एका ओव्हरमध्ये ठोकले सात षटकार
महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने आज एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. सध्या विजय हजारे ट्रॉफी देशात खेळली जात आहे. या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये आज महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांच्यात सामना खेळला जात आहे. याच सामन्यात ऋतुराजने विश्वविक्रम केला आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 331 धावा केल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजने केवळ 159 चेंडूमध्ये नाबाद 220 धावांची खेळी केली. महाराष्ट्राच्या डावातील 49 व्या षटकात ऋतुराजने मोठी कामगिरी केली. त्याने या ओव्हरमध्ये सात चेंडूंमध्ये सात सिक्स ठोकले.
या ओव्हरमधील एका नोबॉलवर सुद्धा त्याने षटकार ठोकला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज बनला आहे. ऋतुराजने उत्तरप्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवा सिंह याची गोलंदाजी फोडून काढली. ऋतुराजने या षटकातील चार चेंडूंमध्ये सलग चार सिक्स लगावले.
त्यानंतर पाचवा चेंडू नो बॉल पडला. विशेष म्हणजे त्या बॉलवरही ऋतुराजने सिक्स ठोकले. अखेरच्या दोन्ही चेंडूवर षटकार ठोकून ऋतुराजने कमालीची कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे भारताचा माजी खेळाडू युवराज सिंहची आठवण येत आहे.