राजकीय
ब्रेकिंग! शिंदे गट अन् शरद पवार गट एकत्र येणार?

- राज्यात विधानसभा मतदारसंघासाठी काल मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार राज्यात 65.02 टक्के इतके मतदान झाले. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान काही टक्क्यांनी जास्त झाले आहे. त्यामुळे आता राज्यात कोणाची सत्ता येणार हे 23 तारखेला पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीकडून सरकार स्थापनेचे दावे होऊ लागले आहेत. यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिरसाट यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य युतीचे संकेत दिले आहेत.
- शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिंदे आणि शरद पवार गट यांच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारला. त्यावर शिरसाट म्हणाले, यासंदर्भातील कोणताही निर्णय शिंदे हेच घेतील. आम्ही त्यावर काही भाष्य करणार नाही. शिंदे साहेब नेहमीच योग्य दिशेने जातात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आम्ही शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ. ते जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
- विधानसभा निवडणुकीत महायुतीच विजयी होणार यात काहीच प्रश्न नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून काय तो निर्णय घेतील. आम्ही ही निवडणूक शिंदे यांच्याच चेहऱ्यावर लढली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास आहे, असे शिरसाट म्हणाले.



