खेळ

ब्रेकिंग! सरफराजचा शतकी धमाका

  • सरफराज खान हे नाव गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक रणजी मोसमात जवळपास १ हजार धावा केल्या आहेत. 
  • तरी त्याला टीम इंडियात येण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. पण आता टीम इंडियात आल्यानंतर त्याने आपण कोणत्या प्रकारचे खेळाडू आहोत, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. वास्तविक, सरफराजला टीम इंडियाच्या कसोटी संघात खेळताना पाहण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. याचे कारण देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची दमदार कामगिरी होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्षी हजारो धावा करूनही सरफराजकडे दुर्लक्ष केले जात होते.
  • पण तो ठाम राहिला. हिम्मत ठेवली. आज त्याची अनेक वर्षांची मेहनत फळाला आली. त्याला काही महिन्यांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली. करिअरच्या पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले. 
  • त्याने त्या मालिकेत दोन अर्धशतके केली. आता तर त्याने करिअरचे पहिले शतक साजरे केले आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज न्यूझीलंडविरुद्ध त्याचे कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक आले. २६ वर्षीय सरफराजने ११० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने चौकारासह आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर खानने आनंदाने उंच उडी मारली आणि मैदानात धावायला सुरुवात केली. यानंतर त्याने आपली बॅट हवेत फिरवत सेलिब्रेशन केले. 
  • त्याच्या या सेलिब्रेशनमध्ये एक वेगळाच आनंद होता. विशेष म्हणजे, सरफराज जेव्हा फलंदाजीला आला होता, त्यावेळी टीम इंडिया अडचणीत होती. तसेच, बोर्डावर किवी संघाकडे मोठी आघाडी होती. रोहित शर्मा बाद झाला होता. 
  • अवघड खेळपट्टीवर त्याला विराट कोहलीसोबत भागीदारी करावी लागली. सरफराजने मोठ्या हुशारीने फलंदाजी करत विराट कोहलीवरील दबाव कमी केला. त्याने चांगल्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. तो आगामी काळात भारतीय मधल्या फळीचा महत्त्वाचा भाग बनू शकतो.

Related Articles

Back to top button