ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेत मोठी घडामोड
- आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात लागलेल्या आचारसंहितेचा फटका महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला बसला आहे. या योजनेचे हप्ते तूर्त थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याने घेतला आहे. त्यामुळे दहा लाख महिला नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्यापासून वंचित राहणार आहेत.
मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक लाभाच्या योजना ताबडतोब थांबवल्या जाव्यात, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. या आदेशानंतर अशा योजनांचा नव्याने आढावा घेण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाची ‘लाडकी बहीण’ योजना मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजनांमध्ये मोडत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्य सरकारच्या सर्व विभागांकडून याबाबतचा तपशील मागवला. मात्र, महिला व बालकल्याण विभागाने या योजनेतून निधी वितरण करणे चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला दिली आहे.
लाडक्या बहिणींना मिळणारे हप्ते तूर्त थांबवण्यात आले असले तरी दोन कोटी ३४ लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच जमा झाला आहे. आचारसंहितेच्या आधीच पुढील महिन्याचा हप्ता मिळेल याची काळजी सरकारने घेतली होती.