राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला आहे. काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले आहे. 18 ऑगस्टपर्यंत काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कालपासून पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु, मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली.