काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पावसाने कमबॅक केले आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर, पुणे आणि पुणे जिल्ह्याचा घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत आज आणि उद्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात पावसाची स्थिती कायम आहे. येथील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत मात्र हलका पाऊस होईल, असा अंदाज आहे.
रायलसीमा जवळ हवेच्या वरील थरात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व मध्य अरबी समु्द्र ते बंगालच्या उपसागराच्या मध्य या पट्ट्यात पूर्व द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे दोन दिवसांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे.