क्राईम
मॉर्निंग वॉकला गेले अन् घात झाला

- राज्यात आज सकाळी भीषण अपघात घडला आहे. रस्त्यावर व्यायाम करत असलेल्या सहा तरुणांना भरधाव ट्रकने चिरडले आहे. या धक्कादायक घटनेत चौघा तरुणांचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे संताप व्यक्त होत आहे.
- सकाळच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काटली गावातील सहा युवक रस्त्यावर व्यायाम करत होते. याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. उर्वरित दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ नागपूरला हलवण्यात आले.
- या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी गडचिरोली-नागपूर महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान ट्रकचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.



