#MeToo चळवळीची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये ती रडत असल्याचे दिसत असून, गेल्या ४-५ वर्षांपासून स्वतःच्या घरातच मानसिक आणि शारीरिक छळ सहन करत असल्याचा आरोप तिने केला आहे. विशेष म्हणजे, तिने कोणाचेही नाव घेतलेले नसल्याने सोशल मीडियावर ती नेमकी कोणाबद्दल बोलतेय, याबद्दल चर्चेला उधाण आले आहे.
या व्हिडीओत तनुश्री म्हणते, मी खूप त्रासले आहे. पोलीस बोलावले होते, त्यांनी सांगितले की तक्रार द्यायची असेल तर पोलीस ठाण्यात या. पण माझे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. मी आजारी आहे. काम करू शकत नाही. मानसिक, शारीरिक छळ सहन करत आहे. दरम्यान तिच्या अशा खुलाशानंतर पुन्हा एकदा तिच्या आजूबाजूचे वातावरण आणि तिच्या आयुष्यात सुरू असलेल्या संघर्षांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत