मॉडेलिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून प्रसिद्ध मॉडेल, ब्लॅक ब्युटी क्विनने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रसिद्ध मॉडेल सैन रेचल उर्फ शंकर प्रिया हिने आत्महत्या केली आहे. कर्जाचा बोजा आणि तणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाँडिचेरीच्या सैन हिचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते. दरम्यान पोलिसांनी तपासाचा जोर वाढवला आहे.
घटनास्थळावरुन एक सुसाइड नोटही सापडली आहे. यामध्ये रेचलने लिहिले, या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही. पैशांसाठी तिने आपले दागिने कर्जाऊ दिल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक बोजाचे कारण आहे की नाही याचाही तपास केला जात आहे.
प्रतिभेच्या जोरावर सैन हिने मॉडेलिंगच्या जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ती पाँडिचेरीच्या करमनी कुप्पममध्ये राहत होती. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या समस्येमुळे तिच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान तिने राहत्या घरात ब्लड प्रेशरच्या गोळ्यांचा अतिरिक्त डोस घेऊन आत्महत्या केली. अनेक फॅशन शो आयोजित करताना झालेल्या नुकसानीमुळे तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. पाँडिचेरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.