राज्यात त्रिभाषा धोरणावरून बराच गदारोळ झाला होता. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध झाला होता. त्रिभाषा सूत्रीत हिंदी भाषाच्या सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एकत्र येऊन विजयी मेळावा घेतला. दरम्यान, एका अभिनेत्रीने ‘मराठी माणसाला आधी मेहनत करायला शिकवा’ असे म्हटले होते. त्यानंतर आता या अभिनेत्रीने सर्वांची माफी मागितली आहे.
वर्सोव्यात राहणारी मराठी अभिनेत्री राजश्री मोरे हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या व्हिडिओमध्ये तिने मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. मराठी माणसांमध्ये मेहनत करण्याची क्षमता नाही आणि परप्रांतीय लोक मुंबईतून निघून गेले तर मराठी माणसाची अवस्था बिकट होईल, असे अपमानास्पद शब्द तिने वापरले होते.
या व्हिडिओला तीव्र विरोध झाला आणि वर्सोवा विधानसभेतील मनसे कार्यकर्त्यांनी थेट ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेत राजश्रीविरोधात तक्रार दाखल केली. या सर्व घडामोडींनंतर राजश्रीला शेवटी सार्वजनिक माफी मागावी लागली. तसेच तिला हा वादग्रस्त व्हिडिओ डिलिट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.