- पुणे शहरात 73 वर्षीय वृद्धाकडून क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट युवतीकडे मला एक पप्पी दे, तुला जे हवे ते देतो, असे म्हणत विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- 73 वर्षीय वृद्धाने एकट्या असलेल्या युवतीसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप युवतीने (वय २७) केला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 3 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. क्लिनिकमध्ये सुरेशचंद चोरडिया (वय ७३) नावाचा वृद्ध रुग्ण म्हणून आला होता. क्लिनिकमध्ये त्यादिवशी रिसेप्शनवर एकटीच युवती उपस्थित होती. ही संधी साधत आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केले. त्याने अचानक रिसेप्शनिस्टच्या गालाला हात लावत “पप्पी दे” अशी मागणी केली.
- यानंतर खिशाकडे हात दाखवत म्हणाला, माझ्याकडे पैसे आहेत, तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो, तुला जे हवे ते मी देतो, पण तू मला पाहिजे ते कर. या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने तात्काळ क्लिनिक सोडले आणि बाहेर पळ काढला. मात्र वृद्धाने तिला पाठलाग करत, उद्या क्लिनिकमध्ये आहेस का? असा प्रश्न विचारत तिला त्रास दिला. पीडित तरुणीने धाडसाने याबाबत तक्रार दिली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो!
