क्राईम

ब्रेकिंग! पुण्यात दोन चिमुकल्या बहिणींचा खून

कल्याण येथे एका १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर जवळील वडा रोड येथे दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या बहिणींचे मृतदेह घरातील वरच्या मजल्यावर पाण्याच्या ड्रममध्ये आढळले. घरात भाड्याने राहणाऱ्या आचाऱ्याने या दोघींची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या आचाऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. ही घटना काल दुपारी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी एकच्या सुमारास या दोन मुली घरातील अंगणात खेळत होत्या. खेळत असतांना त्या अचानक गायब झाल्या. ही घटना घरच्यांच्या लक्षात आली. त्यांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, मुली सापडल्या नाहीत. त्यामुळे या घटनेची तक्रार पोलिसांत देण्यात आली. संध्याकाळी पोलिसांनी देखील मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्या सापडल्या नाही. यानंतर पोलिसांनी मुलींचा घरातच शोध घेतला. यावेळी रात्री दहाच्या सुमारास वरच्या मजल्यावर एका पाण्याच्या ड्रममध्ये दोन्ही मुलींचा मृतदेह आढळला. दोन्ही मुलींचे पाय वर व डोके खाली होते. मुलीचे मृतदेह पाहून घरच्यांनई टाहो फोडला. पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

मुलींचे मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी आचाऱ्याने या दोन्ही मुलींना गोड बोलत वरच्या मजल्यावर नेले. या ठिकाणी त्याने मोठ्या बहिणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या मुलीने याला विरोध करत ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिंग फुटण्याच्या भीतीने आरोपी आचाऱ्याने मोठ्या मुलीचा गळा आवळून खून केला. ही घटना छोट्या बहिणीने पाहिली. यामुळे त्याने तिचाही जीव घेतला. यानंतर त्याने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरावरील पाण्याच्या ड्रममध्ये लपवले. यानंतर तो फरार झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी आचाऱ्याला पुण्यातून अटक केली आहे.

Related Articles

Back to top button