महाराष्ट्र

लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये मिळणार का?

  • राज्यातील लाडक्या बहि‍णींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिले होते. आता लाडक्या बहिणी या पैशांची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून एकवीसशे रुपये कधी देणार? दिलेले आश्वासन कधी पूर्ण करणार, असे सवाल सत्ताधाऱ्यांना विचारले जात आहेत. यातच आता राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीने खळबळ उडाली आहे. अभ्यास करून एकवीसशे रुपयांबाबतचा निर्णय घेतला जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पात ही वाढ लागू करण्याबाबत विभागाने अद्याप तयारी केलेली नाही, अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली. दरम्यान, याबाबत कोणतीही पूर्वतयारी विभागाने केलेली नाही. तसा प्रस्ताव तयार करून अर्थ विभागाकडे पाठवलेलाही नाही, अशीही माहिती समोर आली आहे.
  • ही योजना आणली, त्यावेळी अर्थ विभागाने तीन ते चार महिने आधीपासूनच तयारी सुरू केली होती. आता एकवीसशे रुपये द्यायचे म्हटल्यानंतर तशीच तयारी करावी लागणार आहे. मात्र मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत, असे तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावरून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत, असे सध्या तरी दिसत आहे.
  • दरम्यान, या योजनेवरून सध्या गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे माघारी घेतले जाणार नाहीत, असे तटकरे आधी म्हणाल्या होत्या. नंतर मात्र त्यांनी पैसे माघारी घेणार असल्याचे सांगितले होते. यामुळे गोंधळ वाढला.

Related Articles

Back to top button