आता मान्सूनमध्येही ट्विस्ट!

Admin
2 Min Read

राज्यात अवकाळी पावसाने झोडपून काढलेले असतानाच अचानक मान्सूनने एन्ट्री घेतली. सोलापूरसह अन्य ठिकाणी जोरदार पाऊस झाला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर भाग व्यापून पुढील 24 तासांत हेच वारे विदर्भ गाठणार आहेत. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आज अमरावती, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. परंतु, यातच एक नवी माहिती समोर आली आहे. मान्सून वाऱ्यांचा वेग मंदावणार असून पुढील पाऊस सात जून रोजी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून येणारा मान्सूनचा दुसरा प्रवाह सिक्कीममध्ये प्रवेश करेल. येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया होईल. महाराष्ट्रात जवळपास 45 टक्के भागात मान्सून व्यापला आहे. यानंतर विदर्भाकडे मान्सून वारे सरकू लागले आहेत. राज्यात उद्यापासून मात्र पुढील पाच ते सहा दिवस मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावणार आहे. वाऱ्यांचा पुढील प्रवास अतिशय मंद गतीने होत राहील. त्यामुळे राज्यात पाऊस काही दिवस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. तसेही कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलीच आहे.

उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात सक्रिय असणारे कमी दाबाचे क्षेत्र धिम्या गतीने पुढे सरकत आहे. मान्सून गंगेच्या पश्चिम बंगालमधील क्षेत्रासह सिक्कीम, ओडिशा या राज्यांत प्रवेश करेल, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येईल. राज्यात मान्सूनची वाटचाल मंद राहील. त्यामुळे सध्या धुमाकूळ घालणारा पाऊस कमी होईल. पुढील पाऊस सात जून रोजी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Share This Article