ब्रेकिंग! यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

यंदा देशात सरासरी पेक्षा जास्त पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 2025 मध्ये 105 टक्के पावसाचा अंदाज आहे. तसेच यावेळी एक जूनच्या सुमारास केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी आज सांगितले की, दीर्घकालीन हवामान अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 105 टक्केपर्यंत असू शकतो. भारतीय हवामान विभागानुसार या वर्षीच्या अंदाजानुसार काही प्रदेश वगळता देशातील बहुतेक भागांना अनुकूल पावसाच्या परिस्थितीचा फायदा होण्याची शक्यता आहे.
चार महिन्यांच्या मान्सून हंगामात लडाख, ईशान्य आणि तामिळनाडूमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे आयएमडीने संपूर्ण हंगामात एल निनो परिस्थितीची शक्यता नाकारली आहे. त्यामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत दिली.